Shivratna Shete Majha Katta | चंद्रकोर लावल्यावर जबाबदारी वाढते, शिवव्याख्याते शेटे माझा कट्टावर
मरावे परि किर्तीरुपी उरावे याचं अत्त्युच्च उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. म्हणूनच आजपासून शेकडो वर्षांपूर्वी आणि शेकडो वर्षांनंतर आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषासह महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरुन येतो...पण दुर्दैवाने काही वाचाळवीर आज महाराष्ट्राच्या याच दैदिप्यमान इतिहासाची चिरफाड करत वादग्रस्त वक्तव्य करतायत किंवा जाती-जातीत तेढ निर्माण करतायत.
शिवरायांचे आठवावे रुप असं आपण सगळेच म्हणतो, पण आचरणाचं काय? या प्रश्नाचं उत्तर मिळतं आजचे कट्ट्याचे पाहुणे शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांच्या रुपाने. उक्तीला कृतीची जोड देत, शिवरायांच्या विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी ते अविरत झटत आहेत. गेली तीन दशकं महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यापासून ते मोठ-मोठ्या शहरांमध्ये शिवरत्न शेटे मुक्तकंठाने समग्र शिवकाळ उभा करत आहेत. शिवकालाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांची भ्रमंती करण्याच्या अनेक मोहिमा त्यांनी योजल्यात आणि यशस्वी केल्या आहेत. केवळ इतिहासात न रमता शिवचरित्रात वर्तमानाचा धांडोळा घेण्यात शिवरत्न शेटे यांचा हातखंडा आहे.
शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या मातीचा मस्तकी टिळा लावायचा सोडून आज फक्त माथी भडकवणारी वक्तव्य होतायत. शिवरायांचा जयघोष करत एकीची वज्रमुठ आवळण्याऐवजी एकमेकांकडे बोटं दाखवली जातायत. अशा काळात शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचारांना, आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा ..